Athletes and sports lovers should take advantage of the Maharashtra Olympic Games
महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा
–क्रीडा आयुक्त सुहास दिवसे
पुणे : बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पक स्पर्धेचा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.
महाराष्ट्रऑलिम्पिक स्पर्धा आयोजन संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भारतामध्ये राज्यस्तरावर प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या उत्तमोत्तम खेळाडूंचे क्रीडाकौशल्य पाहण्याची ही मोठी संधी जिल्ह्यातील व बारामतीसह राज्याच्या इतर ८ शहरांच्या खेळाडूंना मिळणार आहे. पुणे व शहर परिसरातील शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून पाठवावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुमारे सतराशे अॅथलिटसह ऑलिम्पियन खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, केंद्र व राज्य शासनाचे क्रीडा पुरस्कारार्थी सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असल्याचे श्री.दिवसे यांनी सांगितले.
बारामती येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांअंतर्गत होणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
क्रीडा ज्योत रॅली
राज्यात क्रीडा वातावरण निर्मिती होण्यासाठी, क्रीडा स्पर्धेची भव्यता नागरिकांना माहिती होण्यासाठी राज्यात विभागनिहाय क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या सर्व क्रीडा ज्योत ३ जानेवारी २०२३ पर्यंत शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आणण्यात येणार आहेत. स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत किल्ले रायगड येथून निघणार असून शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे येणार असल्याची माहिती श्री.दिवसे यांनी दिली.
बैठकीला पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, महानगर पालिका, परिवहन विभाग, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com