through Indian languages – Prof. Ashok Aklujkar
भारतीय भाषांमधून संस्कृतचा प्रसार होण्याची गरज – प्रा.अशोक अकलूजकर
पुणे : ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाचे आशियाई शिक्षण विभागप्रमुख, कॅनडा निवासी प्रा. अशोक अकलूजकर यांच्या जगभर गाजलेल्या “संस्कृत- एका आनंददायी भाषेची सहज, सोपी ओळख” (Sanskrit – An easy introduction & An enchanting language) या पुस्तकाच्या पहिल्या भारतीय आवृत्तीचे प्रकाशन आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेत झाले.
संस्कृतचे अभ्यासक आणि संशोधक असलेले प्रा. अकलूजकर हे ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठात कार्यरत होते. सदरच्या पुस्तकाच्या यापूर्वीच तीन आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अमेरिका, कॅनडा तसेच युरोपातील अनेक देशांत हे पुस्तक संस्कृत अभ्यासकांमध्ये लोकप्रिय झालेले आहे. या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद होत आहे. या पुस्तकाच्या भारतीय आवृत्तीचे प्रकाशनादि अधिकार प्रा. अकलूजकर यांनी भांडारकर संस्थेला दिले आहेत. त्याचबरोबर कोणतेही मानधन न घेता या पुस्तकासाठी देणगी देखील संस्थेला दिली आहे.
प्रा. अकलूजकर यांनी यावेळी बोलतांना संस्कृत भाषेतील शिक्षणासंबंधीचा आढावा घेतला. इंग्रजीबरोबरच भारतीय भाषांमध्ये संस्कृतचा प्रचार-प्रसार अधिक व्हावा या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
प्रसिध्द संस्कृत पंडित, विश्व संस्कृत परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय संस्कृत संस्थान या विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. व्ही. कुटुंब शास्त्री यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन होते. त्यांनी उपस्थितांचे आणि प्रा. अकलूजकर यांचे विशेष आभार मानले. संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य प्रा. प्रदीप आपटे व माजी सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे निबंधक डॉॅ. श्रीनंद बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या पुस्तकाचे तीन खंड असून संस्थेत ते विक्रीस उपलब्ध आहेत.