Due to the new education policy, Marathi will become the language of knowledge, and the worries about the future of Marathi will be resolved – Devendra Fadnavis
नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी ही ज्ञानभाषा होऊन, मराठीच्या भवितव्याबाबतची चिंता मिटेल
– देवेंद्र फडणवीस
वर्धा : नव्या शैक्षणिक धोरणामुळे वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचं शिक्षण मराठीतून मिळू लागलं आहे. त्यामुळे मराठी ही ज्ञानभाषा म्हणून खऱ्या अर्थाने वापरात आली की, मराठीच्या भवितव्याबाबतची चिंता मिटेल, अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. वर्धा इथं सुरु असलेल्या ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात आज संमेलनाच्या ‘वरदा’ या स्मरणिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते बोलत होते. वर्तमानात नवनिर्मित साहित्याला उंची आणि खोली नाही. मात्र, भविष्यात ती मिळेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विदर्भ साहित्य संघाने मराठी साहित्य आणि साहित्यिकांचं संवर्धन करायचं कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलं आहे. संघाच्या शताब्दीं वर्षानिमित्त शासनाकडून १० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. साहित्य संमेलनं ही उणीवांवर बोट ठेवण्यासाठी नव्हे, तर जाणीवा समृद्ध करण्याकरता व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला असा आक्षेप नेहमी घेतला जातो.
मात्र, सकाळी टीव्ही लावल्यावर जे साहित्य राजकारण्यांच्या तोंडून ओसंडून वाहताना दिसतं, त्यावरून आम्ही साहित्यिक नाही, असं कुणी म्हणू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. वर्ध्याच्या महात्मा गांधी साहित्य नगरीत, स्वावलंबी विद्यालय परिसरात सुरु असलेल्या या सत्राला स्थनिक खासदार अमदारांसह विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com