The Prime Minister interacted with the newly recruited Agni Veeras
नव्यानं भरती झालेल्या अग्निवीरांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
पथदर्शी अग्निपथ योजनेचे बिनीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी अग्निवीरांचे अभिनंदन केले.
आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैनिक आपल्या सशस्त्र दलांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही दलातील प्राथमिक प्रशिक्षण सुरु करणाऱ्या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.
या पथदर्शी अग्निपथ योजनेचे बिनीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी अग्निवीरांचे अभिनंदन केले. आपल्या सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यात आणि त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यात ही परिवर्तनकारी योजना परिणामकारक ठरेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या युवा अग्नीवीरांमुळे भारताचे सशस्त्र दल अधिक उत्साहपूर्ण आणि तंत्रज्ञान स्नेही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अग्नीवीरांच्या क्षमतेबद्दल दृढ विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्यातील ऊर्जा सशस्त्र दलांच्या शौर्याचे प्रतिबिंब आहे ज्याने राष्ट्राचा ध्वज नेहमीच उंच फडकत ठेवला आहे.
विविध भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तैनात झाल्यानंतर अग्नीवीरांना समृद्ध अनुभवांची शिदोरी तर मिळेलच शिवाय त्यांना या संधीचा लाभ त्या प्रदेशातील भाषा शिकून घेण्यात आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेण्यात होईल, असे त्यांनी सांगितले.
सांघिक कार्य आणि नेतृत्व कौशल्याचा सन्मान यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळेल, असे ते म्हणाले. अग्निवीरांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातले त्यांचे नैपुण्य अधिक वाढवण्यासाठी कार्य करत असताना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
सशस्त्र दलात चार वर्षांच्या मुदतीवर तरुणांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू करण्यात आली होती. या संवादाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com