The political situation in the state is still uncertain
राज्यातलं राजकीय वातावरण अजूनही अनिश्चितच
मुंबई : राज्याच्या राजकीय मंचावरच्या नाट्यमय घडामोडी अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचलेल्या नाहीत. शिवसेना विधीमंडळ पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्यानं पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी काल केला होता. आपल्या समर्थकांबरोबर एकनाथ शिंदे गुवाहाटी इथं महत्त्वाची बैठक घेत असून नंतर ते पत्रकारपरिषद घेण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी शिंदे यांनी काल गुवाहाटीत कायदेतज्ज्ञांची भेट घेतली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली होती.
पक्ष संघटनेवरील पकड कायम ठेवण्याच्या उद्देशानं कार्यकारिणीची ही बैठक बोलावण्यात आली होती. आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं पोलीस संंरक्षण महाविकास आघाडी सरकारनं काढून घेतलं असल्याचा दावा करणारं पत्र ३८ आमदारांनी गुवाहाटीतून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना उद्देशून लिहीलं आहे.
राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश, मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असा खुलासा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत असं त्यांनी स्पष्टं केलं आहे.
राज्यातल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं संरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढून घेतलं असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे केला होता. बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे असही शिंदे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या संपर्क प्रमुखांना संबोधित केलं, आणि शिवसेना पुन्हा उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. या घडामोडींचे पडसाद राज्यात वविध ठिकाणी पहायला मिळत आहेत.
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा आणि एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारा अशा दोन्ही गटांकडून आपापलं शक्तीप्रदर्शन पदयात्रा, फलक, घोषणा, निदर्शनं अशा मार्गांनी करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला असून, सरकारचं कामकाज सुरु असल्याचं म्हटलं आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. सध्या चालू असलेली निदर्शनं दोन्ही गटांच्या समर्थकांचा स्वाभाविक उद्रेक असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
2 Comments on “राज्यातलं राजकीय वातावरण अजूनही अनिश्चितच”