The political dilemma in the state still persists
राज्यातला राजकीय पेचप्रसंग अद्याप कायम
मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून राज्यात सुरू असलेला राजकीय पेच अद्याप कायम असून त्यामुळे अनिश्चितताही वाढली आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदारांचं ठिकठिकाणी शक्तीप्रदर्शन सुरू आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच्या सरकारवर विश्वास आजही व्यक्त केला.
सरकारचं कामकाज व्यवस्थित सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. सध्या चालू असलेली निदर्शनं दोन्ही गटांच्या समर्थकांचा स्वाभाविक उद्रेक असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याचं पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव संमत केल्याचं ते म्हणाले. शिवसेना हे नाव इतर कुणालाही त्यांच्या पक्षाचं नाव म्हणून वापरता येणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली असून त्यांचं नाव मुख्य पक्षाबरोबर राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत सहा ठराव संमत करण्यात आले.
दरम्यान आपण कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही आणि परिस्थिती निवळल्याशिवाय मुंबईत येणं सुरक्षित वाटत नाही, असं बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहाटी इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. तसंच आपले नेते एकनाथ शिंदेच आहेत आणि आम्ही सगळे शिवसेनेचेच कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला.
विधिमंडळात आम्हीच शिवसेना आहोत आणि दोन तृतीयांश सदस्य असल्यामुळे बहुमत सिद्ध करून दाखवू असं ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत शिवसेनेमुळे आली आणि आम्हालाच त्रास देतात, त्यापेक्षा भाजपासोबत जाण्यातच पक्षाचं हीत असल्याचं मत केसरकर यांनी व्यक्त केलं.
दरम्यान या घडामोडींचे पडसाद राज्यात विविध ठिकाणी पहायला मिळत आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा आणि एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारा अशा दोन्ही गटांकडून आपापलं शक्तीप्रदर्शन पदयात्रा, फलक, घोषणा, निदर्शनं अशा मार्गांनी करण्यात येत आहे. ठाण्यात शिंदे यांच्या लुईस वाडी इथल्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी करून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
ठाणे इथं खासदार श्रीकांत शिंदे यांनीही शक्तिप्रदर्शन केलं. शिंदे यांच्या पाठीशी ५० आमदार आहेत असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं निधी रखडवल्यामुळे राज्यात विकासकामं खोळंबल्याचा आरोप त्यांनी केला.
हे बंड गंभीरपणे घेऊन राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण दिसत नसून हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत राज्यातल्या विद्यमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कार्यरत आहोत असं ते म्हणाले. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. कोणी कुणाच्या नावानं गट तयार केला तरी अधिकृतरित्या या गटाला आणि नावाला मान्यता मिळत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं.
अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या अधिकृत गटनिश्चितीबाबत विधीमंडळानं घटनाविरोधी निर्णय घेऊ नये असं आवाहनही आठवले यांनी केलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com