The recruitment process of 30 thousand teachers will be completed soon
नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर
– शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार
टीईटी परीक्षेत दोषी असलेल्यांवर नियमाप्रमाणे कारवाई
मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवराव होळी, हरिभाऊ बागडे यांनी टीईटी परीक्षा घेऊन शिक्षण भरती करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचा पदभरतीसाठी टीईटी परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणार आहे.
२०१७ नंतर आता २०२३ मध्ये टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या वेळी १२ हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करीत असून ७ हजार ९३० शिक्षकांची भरती करण्यात आली होती. आता शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. टीईटी परीक्षेत दोषी असलेल्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com