आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग सुरु ठेवा

All India Radio launches #AIRNxt

Continue the regional news section of Akashvani Pune Centre

आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग सुरु ठेवा

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांना पत्राद्वारे मागणीAll India Radio launches #AIRNxt

पुणे : पुण्याचे शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासिक तसेच राजकीय महत्त्व लक्षात घेता प्रसारभारतीने आकाशवाणीच्या पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्राद्वारे केली आहे.

श्री. पाटील आपल्या पत्रात म्हणतात, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रादेशिक वृत्त विभागामार्फत दररोज मराठी भाषेत प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्यांचे बातमीपत्र प्रसारित होत असते. प्रसारभारतीद्वारे पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचा आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) केंद्रावरून प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रे प्रसारित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजून अतिशय दुःख झाले. यासोबतच आकाशवाणीच्या विविध भारतीद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, पुणे वृत्तांत आणि इतर सर्व बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे श्रोत्यांशी अतूट नाते असून या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल श्रोत्यांमध्ये आत्मियता आहे. या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे सर्व वयोगटातील श्रोते आहेत. गेली अनेक वर्षे हे श्रोता आणि पुणे केंद्राचे कार्यक्रम यांच्यात अतूट नाते निर्माण झाले आहे. गेल्या दोन पिढ्यांतील सभासदांना आकाशवाणीबद्दल खूप आपुलकी आहे. यामुळेच आकाशवाणीच्या देशातील विविध केंद्रांपैकी पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते मिळाले आहेत. पुणे आकाशवाणी केंद्राच्या श्रोत्यांची संख्या सुमारे २४ लाख आहे.

भारत सरकारचे अनेक मंत्री विविध सरकारी प्रकल्पांच्या शुभारंभासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी दररोज पुण्यात येतात. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जी-२० बैठकीसारखे विविध महत्त्वाचे कार्यक्रमही पुण्यात नियमितपणे आयोजित केले जातात. या कार्यक्रमांचे वृत्तांकन करून ते इतर वृत्त विभागांसह दिल्लीला पाठविण्याचे महत्त्वाचे काम या प्रादेशिक वृत्त विभागाकडून केले जाते. ते बंद करण्याच्या निर्णयामुळे पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींना बातमीपत्रात स्थान मिळण्याविषयी शंका उपस्थित होते. विशेषत: ज्येष्ठ आणि प्रतिष्ठीत नागरिकांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड नाराजी आहे.

या बाबी लक्षात घेता प्रसार भारतीच्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि लोकभावनेचा आदर करून हा निर्णय मागे घ्यावा विनंती करत असल्याचेही श्री. पाटील यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *