The remarkable performance of the Pune Division in Eat Right Challenge
ईट राईट चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पुणे विभागाची उल्लेखनीय कामगिरी
अन्न प्रशासनची मोलाची भूमिका
पुणे : ‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याने देशात १० वा क्रमांक तर सोलापूर जिल्ह्याने २१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागांतर्गत अन्न प्रशासनाने यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणातर्फे ‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अन्न सुरक्षा व मानके कायद्याची अंमलबजावणी व ग्राहक जागृती, अन्न व्यावसाईकांचे प्रशिक्षण, ‘ईट राईट कँपस’, धार्मिक स्थळांमधील प्रसादाची स्वच्छता व सुरक्षा, पदपथावर विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत हमी आदी निकषावर उत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातून ७५ जिल्ह्याची निवड करण्यात आली.
त्यामधे पुणे व सोलापूर जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काल ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारोहात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन या जिल्ह्यांचा बहूमान करण्यात आला.
पुणे विभाग अन्न प्रशासनाच्या पथकाने या स्पर्धेमध्ये सर्व स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. दैनंदिन अंमलबजावणीसह पुण्यातील जंगली महाराज (जेएम) कॉर्नर या ठिकाणाला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ चा दर्जा मिळवून दिला.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिरामधील अन्न छत्राला स्वच्छ प्रसाद निर्मिती आणि वाटपासाठी प्रमाणपत्र मिळाले आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, यशदा, येरवडा कारागृह, सिरम इन्स्टिट्यूट येथील उपहारगृहांना ‘ईट राईट कँपस’ चा दर्जा मिळाला आहे.
पुणे आकुर्डी, कॅम्प, बारामती, देहू – १ व २, चाकण, चिंचवड व लोणावळा येथील फळे व भाजीपाला मार्केट साठी ‘क्लिन अॅण्ड फ्रेश फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल मार्केट’ चा दर्जा मिळालेला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ११६ हॉटेल्सना हायजिन रेटींगचा दर्जा मिळालेला आहे.
पुणे जिल्ह्याला हा बहुमान मिळवून देण्यासाठी अन्न प्रशासनचे पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) संजय नारगुडे, अर्जुन भुजबळ, बाळू ठाकूर, साहेबराव देसाई, श्रीकांत करकाळे तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले.
हडपसर न्युज ब्युरो