To develop a computerized system to control the sale of spurious drugs
बनावट औषध विक्रीवर नियंत्रणासाठी संगणक प्रणाली विकसित करणार
– अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
मुंबई : बनावट औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या काळात उत्पादक – विक्रेते – ग्राहक अशी संगणक प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज विधानपरिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. राठोड म्हणाले की, मुंबईमध्ये औषध विक्री दुकानातून खरेदी केलेल्या इंजेक्शनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी तपासानंतर ते इंजेक्शन बनावट असल्याचे उघडकीस आले. त्याप्रकरणी पोलिसांत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बनावट औषध आणि गोळ्या विक्रीची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी विक्रेते आणि उत्पादकांची तपासणी करण्यात आल्याचे मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.
राज्यात एकूण १ लाख १८ हजार परवाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. तपासणी दरम्यान ८९ हजार किरकोळ विक्रेते, २८ हजार ८५५ घाऊक विक्रेते आणि ९९६ उत्पादक यांची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४५० परवाने निलंबित करण्यात आले असून ५५२ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत.
केंद्र सरकार ऑनलाईन औषध विक्री संदर्भात धोरण तयार करीत आहे. याशिवाय, परराज्यातून येणाऱ्या अशा प्रकारच्या बनावट औषध विक्री संदर्भात कडक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com