The second phase of the budget session of Parliament begins
संसदेच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज सुरु
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज आज सुरु झालं. दोन्ही सभागृहाचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरु झालं. यावेळी दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कामकाज चालू राहणार आहे.
आज पहिल्या दिवशी राज्यसभेत अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी सर्व सदस्यांना पहिल्या टप्प्यातला सकारात्मक उत्साह या टप्प्यातही कायम ठेवण्याचं आवाहन केलं. पहिल्या टप्प्यात कामकाज तहकूब होणं आणि त्यामुळे कामकाजावर परिणाम होणं, या गोष्टी दिसल्या नाहीत, त्यामुळे १०० टक्के कामकाज झालं. याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
संसदीय स्थायी समित्यांच्या बैठकांना उपस्थिती कंमी होती, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सदस्यांनी या बैठकांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.त्याआधी उद्योगपती राहूल बजाज यांच्यासह चार माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सभागृहानं त्यांना आदरांजली वाहिली.
युक्रेनस्थिती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची ऊर्जामागणी पूर्ण करण्यासाठी सरकार शक्य त्या सर्व पर्यायांचा अवलंब करेल, अशी ग्वाही पेट्रोलियममंत्री हरदिप सिंग पुरी यांनी आज राज्यसभेत दिली. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत जम्मू-काश्मिरचा अर्थसंकल्प सादर केला.