The state government is considering setting up an independent corporation on the lines of Hafkin for procurement of medicines in medical hospitals in the state
राज्यात वैद्यकीय रुग्णालयांमधल्या औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा राज्यसरकारचा विचार
राज्यात तंत्रज्ञांच्या साडेचार हजार पदांची भर्ती येत्या चार महिन्यात होणार
ऑटिझम, अर्थात गतीमंद आणि स्वमग्नता आजारानं ग्रस्त बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उभारणार
नागपूर : राज्यातल्या वैद्यकीय रुग्णालयांमधल्या औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते.
राज्यात तंत्रज्ञांच्या साडेचार हजार पदांची भर्ती येत्या चार महिन्यात केली जाईल, असंही ते म्हणाले. मुंबईत जे जे रुग्णालयाच्या शेजारी रिचर्डसन क्रुडास या बंद पडलेल्या कंपनीची सरकारी १८एकर जागा आहे, ती ताब्यात घेऊन तिथं कर्करोग उपचारांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, मात्र त्यात तडजोड करण्याचं काम सुरू आहे, असं महाजन यांनी सांगितलं.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिथले अधिष्ठाता डॉ गुप्ता यांची बदली केली आहे, तर संबधित डॉक्टरची विभागीय चौकशी केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ऑटिझम, अर्थात गतीमंद आणि स्वमग्नता आजारानं ग्रस्त बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उभारली जातील, या आजाराच्या उपचाराचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेत करण्याचं आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलं, याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश टोपे यांनी उपस्थित केली होती.
राज्यातल्या कोविड स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या समन्वयानं एक समिती किंवा कृतीदल स्थापन करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com