The state-level campaign ‘Shasan Apya Dari’ will be launched in Satara by the Chief Minister
‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ
महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
मुंबई : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.
राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com