The teacher should create a better generation Prof. Digambar Durgade
शिक्षकाने उत्तम पिढी घडवावी : प्रा दिगंबर दुर्गाडे
हडपसर : शिक्षक जगातील सर्वोत्तम गोष्टी घडवत असतो. राष्ट्र घडविण्याची जबाबदारी समाजाने शिक्षकांवर सोपवली आहे.समाजाचा,विद्यार्थ्यांचा शिक्षक हा मार्गदर्शक असतो. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान,व्यासंग वाढवून समर्थ भारत आणि उत्तम पिढी घडवावी असे प्रतिपादन पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रल्हाद पवार आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना प्रा. दिगंबर दुर्गाडे बोलत होते.
या प्रसंगी सेवानिवृत्त होणारे पर्यवेक्षक प्रल्हाद पवार यांना संस्थेच्या वतीने चांदीचे नाणे, तसेच रयत बँकेच्या वतीने कर्मवीर अण्णांचा फोटो असलेले चांदीचे नाणे व विद्यालयाच्या वतीने संपूर्ण पोषाख देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी शुभेच्छा देताना म्हणाले शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अध्यापन करावे. आपल्यावर समाज घडविण्याची जबाबदारी आहे या भूमिकेतून आपले कर्तव्य पार पाडावे. विद्यार्थ्यांना शिकवताना काळाच्या प्रवाहात राहून स्वतःही नवनवीन गोष्टी शिकाव्यात.
सहविभागीय अधिकारी शंकर पवार यांनीही सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,बदलत्या शैक्षणिक धोरणांचा आणि नवनवीन शैक्षणिक साधनांचा वापर करून प्रभावी अध्यापन करून केवळ परीक्षाधिष्ठीत विद्यार्थी न घडवता विद्यार्थ्यांना जीवनशिक्षण द्यावे. आपल्या कामाकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून पाहावे.
शिक्षकांच्या आणि नातेवाईकांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी मेमाणे पी.एस,प्रियांका पवार- वाडेकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.आभार पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर यांनी मानले तर सूत्रसंचालन अनिल वाव्हळ ,प्रतापराव गायकवाड, रूपाली सोनावळे व सविता पाषाणकर यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com