Health Minister Rajesh Tope claims that there is no possibility of a fourth wave of corona in the state
राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नसल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा
राज्यात काल कोविड-१९ च्या ३२६ नव्या रुग्णांची नोंद
नागपुर : राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
लशीच्या वर्धक मात्रेबाबत केंद्राच्या सूचना आहे. त्यानुसार ही मात्रा दिली जाते आहे. अँटीबॉडीज टेस्ट करुन लोकांनी वर्धक मात्रेबाबत निर्णय घ्यावा, असंही टोपे म्हणाले.
शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक भागातल्या पक्ष संघटनेला वेळ देतोय, कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देत असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान राज्यात काल कोविड-१९ च्या ३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, २५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात काल एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यात १ हजार ९०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत काल २३४ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी २२६ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ८ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत सध्या १ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात आतापर्यंत १९२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण
देशव्यापी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे.
त्यात ८८ कोटी १८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर ३ कोटी १५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.
हडपसर न्युज ब्युरो