Three arrested in case of fake bills of 111 crores; Action of Maharashtra Goods and Services Tax Department
१११ कोटींच्या बनावट देयका प्रकरणी तिघांना अटक; महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाची कारवाई
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 111 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी देयका प्रकरणी कारवाई करुन तिघांना अटक केली. किशोर कुमार मंजुनाथ पुजारी, अभिषेक पांडु शेट्टी, नितीन विनोद सावंत अशी त्यांची नावे असून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मे. पुजारी ट्रेडर्स आणि इतर सहा कंपन्या मे. श्री साई ट्रेडर्स, मे. अन्ना एंटरप्रायजेस, मे. अभिषेक ट्रेडर्स, मे. शेट्टी एंटरप्रायजेस, मे. ए. पी. ट्रेडर्स, आणि मे. के. जी. एन ट्रेडर्स या कंपन्यांच्या विरोधात धडक अन्वेषण मोहिमेअंतर्गत २३ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली.
मे. पुजारी ट्रेडर्स, मे. अभिषेक ट्रेडर्स, आणि मे. ए पी ट्रेडर्स यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वतंत्र अन्वेषण भेटी देण्यात आल्या. प्राथमिक तपासादरम्यान असे आढळुन आले की, नितीन विनोद सावंत यांनी किशोर कुमार मंजुनाथ पुजारी आणि अभिषेक पांडु शेट्टी यांच्या मदतीने वरील सात कंपन्यांची वस्तू व सेवा कर नोंदणी केली.
या सात कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी रु १११.७४ कोटी बनावट देयकांच्या माध्यमातून रु. २०.१९ कोटींचे बनावट इनपुट टैक्स क्रेडिट प्रत्यक्ष मालाची विक्री न करता दिल्याचे आढळून आले.
राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ, मुंबई आणि राजेंद्र टिळेकर, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर विभागाचे सहायक राज्यकर आयुक्त अविनाश चव्हाण, गणेश रासकर, संजय शेटे व दादासाहेब शिंदे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com