Three Marathi films ‘Potra’, ‘Karkhanisanchi Wari’ and ‘Ticham Shahar Honam’ selected for Cannes International Film Festival
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड
मुंबई: येत्या १७ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मुंबईत ही माहिती दिली.
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणं, तसंच देशातल्या चित्रिकरण आणि पर्यटन स्थळांचं महत्व वाढवणं या हेतुनं राज्य शासन मराठी चित्रपटांचं प्रदर्शन कान्स आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात करतं. या महोत्सवासाठी निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतात.
या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत श्री. अशोक राणे, श्री. सतिश जकातदार, श्रीमती किशोरी शहाणे-विज, श्री. धीरज मेश्राम, श्री मनोज कदम, श्री. महेंद्र तेरेदेसाई व श्री. दिलीप ठाकुर या ७ तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा”, नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं” या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो