It is necessary to adopt an environment-friendly lifestyle
पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अय्यर यांचे प्रतिपादन
हवामान बदलाच्या समस्यांवर २०२८ पर्यंत १ अब्ज लोकांना एकत्र आणायचं भारताचं उद्दिष्ट
मुंबई : लाईफ हा उपक्रम म्हणजे, वैयक्तिक आणि सामुहिक पातळीवरच्या जीवनशैलीला हवामान बदलांविषयक उपाययोजनांच्या केंद्रस्थानी आणणारी भारताच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जागतिक चळवळ आहे असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी म्हटलं आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनातूनच जगातील सर्व देशांचा सर्वंकष विकास साधला जाईल. सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लाईफ फॉर एन्व्हायर्न्मेंट’ संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना आत्मसात करुनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करु शकतो, असे प्रतिपादन नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी आज येथे केले.
श्री. अय्यर यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्र येऊन वातावरणीय बदल टाळण्यासाठी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. पाण्याचा अनिर्बंध वापर टाळणे, विजेचा आवश्यक तेवढाच वापर करणे, अन्न वाया न घालवणे, इंधनाच्या बचतीची सवय लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वैयक्तिक, सामाजिक तसेच देशासाठी पर्यावरणपूरक सवयी लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अय्यर यांनी आज जी २० समुहाच्या विकासविषयक कार्यकारी गटाच्या मुंबईत होत असलेल्या पहिल्या बैठकीला जोडून, इन्फ्युजींग न्यू लाईफ इन टू ग्रीन डेव्हलपमेंट या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीनं संबोधीत केलं. त्यावेळी ते बोलत होते.
या चळवळीअंतर्गत, हवामान बदलाच्या समस्यांच्या अनुषंगानं वैयक्तीक तसंच सामुहिक पातळीवर उपाययोजना राबवता याव्यात यासाठी, २०२२ ते २०२८ या काळात १ अब्ज लोकांना एकत्रित आणायचा उद्देश भारतानं समोर ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारताच्या या चळवळीला इंग्लंड आणि फ्रान्ससह दहा देशांनी पाठबळ दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भारताचे जी-२० शेरपा अमिताभ कांत यांनीही या कार्यक्रमाला संबोधीत केलं. हवामान बदलासंबंधी एखादा देश नाही तर वैयक्तिक आणि सामुहिक वर्तनामुळे बदल घडून येतील, त्यामुळेच लोकांच्या हवामानविषयक वैयक्तिक आणि सामुहिक वर्तनात बदल घडवून आणणं हा मिशन लाईफ या चळवळीचा उद्देश आहे असं अमिताभ कांत म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com