Organized district level training camp under Maharashtra Startup
महाराष्ट्र स्टार्टअप अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले केले आहे.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांचे सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचराव्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा आदी), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ्ज समितीसमोर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून जिल्हास्तरावर अव्वल ३ पारितेषिक विजेते घोषित केले जातील. त्यामध्ये प्रथम पारितोषिक रुपये २५ हजार, व्दितीय पारितोषिक रुपये १५ हजार आणि तृतीय पारितोषिक रुपये १० हजार दिले देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विदयार्थी, युवक-युवती व नावीन्यपूर्ण नवउद्योजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ https://www.mahastartupyatra.in/ वर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांचेकडे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२३१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com