Training of faculty in the ‘Placement Cell’ of the University
विद्यापीठाच्या ‘प्लेसमेंट सेल’ मध्ये प्राध्यापकांचे प्रशिक्षण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: ‘इन्फोसिस बीपीएम’ आणि ‘रुसा’ चा एकत्रित उपक्रम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘प्लेसमेंट आणि कॉर्पोरेट रिलेशन सेल’ मध्ये विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना क्षमता विकासाचे धडे देण्यात येत आहेत. १९ ते २७ जुलै दरम्यान हे प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या उपस्थितीत झाली.
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) रोजगारक्षमता व सुधारणा केंद्राच्या माध्यमातून ‘इन्फोसिस’च्या सहकार्याने या प्राध्यापक प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, इन्फोसिसचे स्तिफर्ड पै, मुकेश कुमार आणि शालिनी जयकृष्णन विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलचे मार्गदर्शक संजीव मेहता आदी उपस्थित होते.
प्राध्यापकांनी प्रशिक्षणाकडे ‘टीक मार्क ॲक्टिव्हीटी’ म्हणून न पाहता या यातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे मी स्वतःमध्ये तसेच शिकवण्याच्या पद्धतीत कश्या प्रकारे बदल करीन याबाबत चिंतन करायला हवे. विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी करताना आपल्या संस्कृतीची आणि स्थानिक गरजांचीही माहितीही त्यांना असावी.
– डॉ.संजीव सोनवणे, प्र – कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठ परिसंस्था ५५ विभागांपुरती मर्यादित नसून जवळपास १ हजार संलग्न महाविद्यालयातील आठ लाख विद्यार्थी आणि तेथील प्राध्यापकांचे आहे. विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी ‘ बनविण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असून याची सुरुवात विद्यापीठातील प्राध्यापकांपासून होत आहे. टप्प्याटप्प्याने विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
फडणवीस म्हणाले, पुणे हे आयटी हब असून विद्येचे माहेरघरही आहे. शिक्षण आणि उद्योग यांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले विद्यार्थी घडण्यास मदत होईल.
यावेळी पै म्हणाले, इन्फोसिस मध्ये ४६ टक्के महिला असून त्यातील १७ टक्के या अधिकारी पदावर आहेत. इन्फोसिस ने आतापर्यंत अनेक प्रशिक्षणे घेतली असून त्यातून उद्योगांना अपेक्षित उत्तम विद्यार्थी व प्राध्यापक घडविण्याचा आमचा मानस आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com