Babasaheb Ambedkar special travel package under ‘Dekho Apna Desh’ initiative
‘देखो अपना देश’ उपक्रमाअंतर्गत बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
‘देखो अपना देश’ उपक्रमाअंतर्गत आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नवी दिल्ली : ‘देखो अपना देश’ या उपक्रमाअंतर्गत आयआरसीटीसी तर्फे, बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज घोषित करण्यात आले आहे. या अंतर्गत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन प्रवाशांना घेता येणार आहे.
बाबासाहेब आंबेडकर पॅकेज यात्रेअंतर्गत, पहिला प्रवास एप्रिल 2023 पासून नवी दिल्लीहून सुरू होईल. ‘देखो अपना देश’ या उपक्रमाअंतर्गत, रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ-आयआरसीटीसी सोबत, विविध संकल्पनांवर आधारित, भारत गौरव पर्यटन गाड्या काही विशिष्ट सर्किट्स मध्ये चालवते.
ह्या प्रस्तावित भारत गौरव पर्यटन ट्रेनचा एकूण प्रवास सात रात्री आठ दिवस असा असून, त्याची सुरुवात दिल्लीपासून होणार आहे. पहिला थांबा मध्यप्रदेशात महू -ह्या डॉ आंबेडकरांच्या जन्मस्थानी (भीम जन्म भूमी )असेल, त्यानंतर ही गाडी नागपूरला जाईल, जिथून प्रवासी दीक्षाभूमी या नवयान बौद्ध पंथाच्या पवित्र स्थळाला भेट द्यायला जाऊ शकतील. पुढे ही गाडी नागपूरहून सांची इथे जाईल. सांचीच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये सुप्रसिद्ध सांची स्तूप आणि इतर बौद्ध स्थळांना भेट देता येईल. त्यापुढे सारनाथ आणि वाराणसीला काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनानंतर शेवटी ही ट्रेन गया इथे जाईल. इथे पर्यटकांना प्रसिद्ध महाबोधी मंदिर आणि इतर बौद्धमठांना भेट देण्यासाठी नेले जाईल. यावेळी या मार्गावरील राजगीर आणि नालंदा आणखी दोन महत्त्वाची बौद्ध स्थळेही दाखवली जातील. हा पर्यटन दौरा शेवटी नवी दिल्लीला येऊन संपेल.
देशांतर्गत पर्यंटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ या उपक्रमानुसार रेल्वे मंत्रालयाने ही भारत गौरव यात्रा ट्रेन सुरू केली आहे. या ट्रेनच्या पॅकेजची माहिती, आयआरसीटीसीच्या https://www.irctctourism.com. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com