Uddhav Thackeray resigns as Chief Minister and resigns as a member of the Legislative Council
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.
बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी २८ जूनच्या रात्री राज्यपालांना पत्र देत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या विशेष अधिवेशन घेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.
१० दिवसात ठाकरे सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. एक अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंनी काल बंडखोर शिवसेना नेत्यांना भावनिक सादही घातली. मात्र, बंडखोर शिंदे गट त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. तर, सर्वोच्च न्यायालयानेही महाविकास आघाडी सरकारला धक्का देत बहुमत चाचणी पुढे ढकलता येणार नसल्याचा निर्णय दिला.
उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने विधानसभेत संख्याबळ नसलेली महाविकास आघाडी अखेर कोलमडली.
राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखत पत्र मिळताच २४ तासात पत्र दिलं आहे. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी लटकून पडली आहे. राज्यपालांनी तो निर्णय घेतला असेल तर आम्हाला त्यांच्या बद्दल असलेला आदर द्विगुणित होईलस असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नामांतराचा ठराव
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, ‘मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरू राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली आहे. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली.
औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मांडला त्यावेळी शिवसेनेचे केवळ आम्ही चार जण होतो, याचा खेद वाटला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी ठरावाला एका शब्दानं विरोध केला नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.
आपण ज्या विधानपरिषदेचे सदस्य आहोत त्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांसारख्या बंडखोरांची खिल्ली उडवत ठाकरे म्हणाले की, क्षुल्लक काम करणाऱ्यांना पक्षात स्थान मिळाले आणि मोठे केले गेले.
अशोक चव्हाण यांचा हवाला देत ते म्हणाले की, गरज पडली तर पक्षातून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ, पण बंडखोर आमदारांचे मन वळवू, असे काँग्रेसचे नेते होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपण स्वीकारतो असे ते म्हणाले. ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचेही आभार मानले.
भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांकडून जल्लोष
विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवल्याची दृष्य समोर आली आहेत. मुंबईमध्ये बहुमत चाचणीसाठी आमदार जमलेल्या ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणा देत जल्लोष साजरा केला.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. फटाके वाजवून आणि पेढे वाटून भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, अशा प्रकारचे ट्वीटसही येऊ लागले आहेत.
राजभवनावर जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाल्याचं समजतेय. कदाचीत गुरुवारी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात.
ट्वीटस
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपकडून तात्काळ एक व्हीडिओ ट्वीट करण्यात आहे.
“मी पुन्हा येईन ….. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!” अशा मथळ्याखाली हा व्हीडिओ ट्वीट करण्यात आला आहे.
आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार स्थापन करण्याचा दावा करतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
उद्या महाराष्ट्राचा जनतेची “उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकार पासून मुक्तता होणार, असे ट्वीट भाजप नेते सोमय्या यांनी केले आहे.
बहुमत गमावल्याची खात्री पटल्यानंतर देखील सत्तेच्या मोहापायी सर्वोच्च न्यायालयात गेलेले महाविकास आघाडी सरकार अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडले. वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असता तर थोडी तरी अब्रू वाचली असती, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केलेय.
तर मी पुन्हा येईन ….. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! असे ट्वीट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेय.
यश नम्रतेनं घ्यायचं
“मी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, यश नम्रतेनं घ्यायचं असतं. उद्धवजींचा राजीनामा ही सेलिब्रेट करण्याचा विषय नाही,” अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com