University Certificate Course for Disabled Soldiers
अपंग सैनिकांसाठी विद्यापीठाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
घरगुती इलेक्ट्रोनिक उपकरणे दुरुस्ती व देखभाल हा तीन महिन्याचा अभ्यासक्रम सुरू होणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राकडून गोदरेज कंपनीच्या सहकार्याने घरगुती इलेक्ट्रोनिक उपकरणे दुरुस्ती व देखभाल हा अभ्यासक्रम ‘क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट’ च्या अपंग सैनिकांसाठी हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबाबत नुकतीच विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रात बैठक पार पडली. या बैठकीला लॉकिम मोटर्सचे उपाध्यक्ष अभय पेंडसे, असोसिएट जनरल मॅनेजर निवृत्ती साने, असोसिएट चीफ जनरल संदीप देव , त्याचबरोबर विद्यापीठाचे डॉ.सी.एम.चितळे, संचालक प्रा.राधाकृष्ण पंडित, समन्वयक डॉ.पूजा मोरे, इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल राहुल बाली, वसंत बालेवर, एम.पी.शिंदे, दिलीप ओक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. पंडित म्हणाले, गोदरेज या नामांकित कंपनीची टीम या यासाठी मार्गदर्शन करणार असल्याने हा अभ्यासक्रम खऱ्या अर्थाने वेगळा ठरेल. या केंद्राच्या माध्यमातून अनेक नवे अभ्यासक्रम भविष्यातही देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आम्हाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे आणि प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे सातत्याने मार्गदर्शन देखील लाभत आहे.
यावेळी अभय पेंडसे म्हणाले, हा अभ्यासक्रम अपंग सैनिकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करेल.
हा अभ्यासक्रम पुढील तीन महिन्यांसाठी खडकी येथील ‘क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट’ येथे आयोजित करण्यात येईल. विद्यापीठातील शिक्षकांसोबत गोदरेज कंपनीचे तज्ज्ञ या अभ्यासक्रमादरम्यान मार्गदर्शन करणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या समन्वयक म्हणून डॉ.पूजा मोरे काम पाहणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com