Urgently implement process for vacancies in Medical Education Department – Medical Education Minister Girish Mahajan
वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
वैद्यकीय शिक्षण विभागाचा घेतला आढावा
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा श्री. महाजन यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, हाफकिन संस्थेच्या श्रीमती चंद्रा, विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले, सरळ सेवेद्वारे लोकसेवा आयोगामार्फत प्रलंबित पदांची नियुक्ती प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग तीन व चारची रिक्त पदे तातडीने भरण्याकरीता सुयोग्य संस्थेमार्फत पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात यावी.
वरिष्ठ निवासी संवर्गातील पदे नव्याने निर्माण करून त्यास तातडीने मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात यावी.
जेनरिक औषधाद्वारे रुग्णांना औषधी उपलब्ध करुन देणे,आशियाई विकास बँकेद्वारे अर्थसहाय्यित प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जळगाव येथील प्रस्तावित शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि प्रस्तावित मेडिकल हब बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे. केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत मंजुरी प्राप्त असलेले बायो मेडिसिनल प्लांट इन्स्टिट्यूट जामनेर तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत इंटिग्रेटेड रेसिडेन्शिअल बिल्डिंग बांधकामासाठी प्राधान्याने प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल,या करीता पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने सुचवलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, तसेच बांधकामाधीन वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणावर रुग्णालयाचे परिचलन व्यवस्थापन करण्यावर प्राधान्य द्यावे, असेही श्री. महाजन म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com