Veteran actor Prashant Damle announced “Brahman Bhushan” award
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर
पुणे : आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना देण्यात येणार असल्याचे नियतकालिकांचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी व संचालक संजय ओर्पे यांनी आज येथे दिली.
व्यावसायिक नाटकांच्या 12 हजार पाचशेंहून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केलेले विश्वविक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी मिळाली आहे, या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार जाहीर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभामध्ये प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले हे प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
येत्या शनिवार, दि. 6 मे 2023 रोजी सायं. 5.30 वाजता मॉडर्न कॉलेज सभाग़ृह, शिवाजीनगर येथे होणार्या या समारंभात इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार साहित्यिक व पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांना, डॉ. रामचंद्र देखणे युवा कीर्तनकार पुरस्कार सौ. मानसी बडवे यांना आणि भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे या शतकमहोत्सवी संस्थेला देण्यात येणार आहे. रोख बक्षिस, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण चितळे (अध्यक्ष, महाराष्ट्र चित्पावन संघ) तर डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर (2013), अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी (2014), एअर मार्शल भूषण गोखले (2015), पं. वसंतराव गाडगीळ (2016), पितांबरीचे श्री. रविंद्र प्रभुदेसाई (2017), पौरोहित्यांचे संघटन करणार्या श्रीसद्गुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत कुलकर्णी (2018), सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे (2019) आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे (2022) यांना ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ब्राह्मण समाजाच्या उन्नतीकरिता आणि प्रगतीकरिता 2011 पासून आम्ही सारे ब्राह्मण हे पाक्षिक व 2005 पासून ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक प्रकाशित होत आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com