Veteran actor Vikram Gokhale passed away
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन
अल्प परिचय
विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले’
अभिनयातील बहुआयामी ‘विक्रम’ काळाच्या पडद्याआड
विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं
पुणे: मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमधील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यामध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. गेले पंधरा दिवस त्यांच्यावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती आणि उपचारांना प्रतिसाद देत नव्हती.
सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
त्यांचा पार्थिव देह दुपारी चार वाजता बालगंधर्व रंग मंदिरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी मध्ये त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
अल्प परिचय
विक्रम गोखले यांचा जन्म पुण्यामध्ये ३० ऑक्टोबर १९४७ ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रकांत गोखले आणि आईचे नाव हेमवती गोखले होते.
विक्रम गोखले यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. विक्रम गोखले यांचे बालपण हे पुण्यातच गेले. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात झालं होत.
एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितली की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याचा अजिबात विचार नव्हता. त्यांना भारतीय हवाई दलात सेवा करण्याची इच्छा होती, त्यासाठी आवश्यक असलेली PSB Test आणि SSB ची परीक्षा पास झाले होते. पण काही अपरिहार्य कारणामुळे ते भरती होऊ शकले नाही. त्यां नंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत क्लार्क म्हणून नोकरी केली पण सात दिवसातच त्याचा राजीनामा दिला. या नंतर त्यांनी मराठी रंगभूमीवर काम करण्यास सुरवात केली
१९७१ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी ‘परवाना’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात (Bollywood) पदार्पण केलं. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.अभिनय क्षेत्रातील चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता. त्यांनी 80 हून अधिक चित्रपट आणि 17 मालिकांमध्ये काम केले.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना अनेक वेळा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2011 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला, तर मराठी चित्रपट ‘अनुमती’साठी विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला आहे. अभिनयासोबतच त्यांनी ‘आघात’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले .
विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच दिनांक 15 ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली
अभिनयातील बहुआयामी ‘विक्रम’ काळाच्या पडद्याआड
‘भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन कला क्षेत्राची हानी आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत, रंगभूमी, दूरचित्रवाणी आपल्या दमदार कामगिरीने आदराचे आणि वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते असं खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. त्यांनी कसदार अभिनयाने नायक, सहअभिनेता ते चरित्र नायक अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला. अभिनयात ‘निशब्द-निश्चल’अशी जागा घेण्याचे कसब असो वा, पल्लेदार संवादफेक त्यातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. एका प्रतिभावंत मराठी सुपुत्राने भारतीय रंगभूमी, चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या क्षेत्रातील नव्या पिढीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे एका कलासक्त मार्गदर्शकाची निश्चितच उणीव भासत राहील, ही कला क्षेत्राची हानीच आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मराठी,हिंदी सिनेसृष्टी गाजविणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनाने कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले – उपमुख्यमंत्री
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणाऱ्या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणाऱ्या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना!
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून श्रद्धांजली
ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. तसेच त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच नव्हे तर चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली.
मंत्री श्री. पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतः चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांसाठी ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे कधीही भरुन निघणार नाही असे नुकसान झाले आहे. त्यांची संवादशैली ही प्रत्येकालाच प्रभावित करणारी होती. ‘वजीर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात कायम आहे. मराठी साहित्य, सांस्कृतिक ,राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात या ‘वजीर’ची खूप चर्चा झाली. त्यासोबतच नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकर यांचे मित्र रामभाऊ अभ्यंकर यांची भूमिका नेहमीच स्मरणात राहील. एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणूनही ते कायम स्मरणात राहत
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com