Union Health Minister directs nationwide vigilance in view of rising corona outbreak in some countries
काही देशांमधला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशभर सतर्कता बाळगण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
नवी दिल्ली : युरोप आणि पूर्व आशियातल्या काही देशांमध्ये कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता, देशभर अधिक सतर्कता बाळगावी, बारकाईनं लक्ष ठेवावं, तसंच जोमानं जनुकीय सूत्रनिर्धारण करावं, असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लसीकरण मोहिमेच्या आणि जनुक सर्वेक्षणाच्या सद्यस्थितीबाबत आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आरोग्य सचिव राजेश भूषण, राष्ट्रीय लसीकरण तात्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एन.के अरोरा, निती आयोगाचे सचिव वी. के पॉल, वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया, तसंच जैव तंत्रज्ञान सचिव डॉक्टर राजेश गोखले उपस्थित होते.
चीन, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, विएतनाम, सिंगापुर आणि युरोपातल्या काही देशांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढते आहे. चीनमध्ये १ कोटी लोकांना लॉकडाऊनमध्ये ठेवलं आहे. इस्राइलमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूचे दोन बाधित आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत.