President of Shiv Sangram organization Vinayak Mete passed away in an accident
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघातात निधन
संघर्षमय राजकीय प्रवास
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते.
मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीसाठी ते बीडहून मुंबईला येत होते. पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ त्यांची गाडी पुढच्या वाहनाला धडकली.
या अपघातात मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. नंतर त्यांचं निधन झालं असल्याचं रुग्णालय प्रशासनानं जाहीर केलं. अपघातात त्यांचा वाहनचालकही जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
विनायक मेटे २०१४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमधे होते. २०१४ मधे त्यांनी भाजपाशी आघाडी करत बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
२०१६ मधे ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. ते मराठा आरक्षण आणि मुंबईत समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी साडेतीन वाजता बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
ट्रकनं हुलकावणी दिल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात धाव घेतली. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची चौकशी केली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दुर्दैवी आणि दु:खद बातमी मला समजली, माझा विश्वास बसला नाही. शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं निधन झालं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारा नेता, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा नेता अशी ओळख होती, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
गेल्या आठवड्यात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही आहात मराठा समाजाला न्याय मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचं सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठं आहे अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मेटे यांना आदरांजली वाहिली आहे.
विनायक मेटे यांचं अपघाती निधन अत्यंत वेदना देणारं असून त्यांच्या निधनानं मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचं नेतृत्व हरपलं अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मेटे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
राजकीय प्रवास
१९९६ पासून आमदार असलेल्या विनायक मेटेंचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नसली, तरी आता त्यांचे भाऊ सक्रिय राजकारणात आहेत. मेटे यांच्या पत्नी मात्र राजकारणापासून दूर आहेत. त्या वरिष्ठ अधिकारी आहेत.
१९८६ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटेंनी काम सुरू केलं होतं. १९८७ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख निवड करण्यात आली होती.
१९९४ मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती.
१९९५ मध्ये त्यांनी मराठवाडा लोकविकास मंचची स्थापना केली होती. १९९८ मध्ये नवमहाराष्ट्र विकास पार्टीची स्थापनाही विनायक मेटेंनी केली होती.
विनायक मेटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. १९९९ मध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. २००२ मध्ये त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली होती.
३१ जानेवारी १९९६ ते २० एप्रिल २००० या काळात ते पहिल्यांदा विधान परिषदेत गेले. राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. २८ जुलै २००० ते २७ जुलै २००६ मध्ये ते आजपर्यंत ते विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेतून निवडून गेले होते. सलग ते पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते.
मेटे कुटुंब
विनायक मेटे यांनी पदवीपर्यंत (बी.ए.) शिक्षण घेतलेलं होतं. १९९६ पासून विधान परिषदेच्या माध्यमातून मेटे राजकारणात आहे. त्यांच्या पत्नीचं नाव डॉ. ज्योती आनंदराव लाटकर-मेटे असं आहे. त्या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. विनायक मेटे यांना दोन मुलं असून, त्यांच्या मुलाचं नाव आशुतोष विनायक मेटे (वय १८), तर मुलीचं नाव आकांक्षा विनायक मेटे (वय २१) आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com