Organized second edition of “Vitasta – The Festival of Kashmir” at Pune
पुणे इथे “वितस्ता – द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर” च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुणे इथे “वितस्ता – द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर” च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन
येत्या 31 मार्च ते 2 एप्रिल 2023 या कालावधीत होणार “वितस्ता – द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर”
पुणे: स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमीत्त आयोजीत केल्या जात असलेल्या उपक्रमांच्या मालिकेअंतर्गत महाराष्ट्रात पुणे इथे येत्या 31 मार्च ते 2 एप्रिल 2023 या कालावधीत “वितस्ता – द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर” च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले जाणार आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने, आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ तसेच पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विदयमाने या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
संपूर्ण देशाला, विशेषत: देशातील ज्या नागरिकांना अद्यापही काश्मीरच्या पवित्र भूमीला भेट देण्याची संधी मिळालेली नाही, अशांना काश्मीरमधील महान सांस्कृतिक वारसा, तिथली विविधता आणि वैशिष्ट्यांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या महोत्सवादरम्यान संगीत कला, नृत्य कला, हस्तकला, अशा विविध कला क्षेत्राशी संबंधीत कलाकार त्यांच्या कला विविध कार्यक्रमांतून सादर करणार आहेत. यात काश्मीरमधील लयबद्ध लोकनृत्यांचे सादरीकरण, काश्मीरमधील पारंपारिक वाद्ये आणि या वाद्यांच्या उपयोगाने रचलेल्या गीतांचे सादरीकरण, ‘भांड पाथेर’ या काश्मीरच्या वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्याचा प्रयोग, प्रसिद्ध संतूर वादक आणि संगीतकार पंडित अभय रुस्तम सोपोरी यांचे संगीतमय कार्यक्रम, ‘सूफिस्टिकेशन’ या काश्मिरी सूफी बँडच्या संस्थापक आभा हंजूरा यांचा संगीतविषयक कार्यक्रम असे कलाविषयक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
यासोबतच काश्मिरी पाककला मेळावा, काश्मिरी हस्तशिल्प कला प्रदर्शन, पश्मिना या लोकर विणकामाचे प्रदर्शन, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन (पेपीयर मॅशे – papier mache), काष्ठ शिल्पांचे (लाकडी शिल्पांचे) प्रदर्शन तसेच या कलांसंबंधी कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय कश्मीर आणि वितस्ता नदीसोबतच, महाराष्ट्र आणि गोदावरी नदीशी निगडीत विविध पैलु आणि विषयांवर साहित्य अकादमीशी संबंधीत प्रतिथयश बुद्धिवंताचा सहभाग असलेल्या परिसंवाद आणि चर्चासत्राचेही आयोजन या महोत्सवात केले जाणार आहे.
या महोत्सवादरम्यान ललित कला अकादमीच्या वतीने काश्मीर आणि महाराष्ट्रातील परस्परांसोबत काम करत असलेल्या कलाकारांसाठी शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी कलाविषयक स्पर्धा, कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शारदा स्तोत्र सादरीकरण अशा अनेक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.
वैदिक काळापासून अत्यंत पवित्र मानल्या जात असलेल्या वितस्ता नदीशी संबंधीत समाजातील पारंपरिक रुढी परंपरा या महोत्सवाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. नीलमत पुराण, वितस्ता महामाया, हरचरिता चिंतामणी, राजतरंगिणी अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या नदीचा उल्लेख आढळतो. असे मानले जाते की या वंदनीय नदीचा निर्मळ प्रवाह मानवाच्या मनातील वाईट विचारांचा नाश करतो.
अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या वितस्ता नदीची समृद्धी आणि वारसा साजरा करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने अशाप्रकारचा भव्य आणि सर्वंकष स्वरुपातील महोत्सव आयोजित केला जात असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पाला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com