Water levy levied at concessional rates in 11 villages covered by Pune Municipal Corporation – Prajakt Tanpure
पुणे मनपा हद्दीत समाविष्ट ११ गावांमध्ये सवलतीच्या दराने पाणीपट्टी आकारणी – प्राजक्त तनपुरे
मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा समावेश पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात आला असून या गावांची कर आकारणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार करण्यात आली आहे तर पाणीपट्टी ही सवलतीच्या दराने आकारण्यात आली आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य संजय जगताप, चेतन तुपे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ११ गावांचा पाणीपुरवठा नियोजन करण्याचे काम सुरु असून मलनिस्सारण प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया केली आहे.
३९२ कोटी रुपये खर्चाचा मलनिस्सारण प्रकल्प करण्यात येणार आहे. या ११ गावातील कचरा संकलनासाठी महापालिकेची ३२ आणि पूर्वीच्या या ११ ग्रामपंचायतींची ६२ वाहने उपलब्ध असून १०७ कायम तर ३०० कंत्राटी सेवक कार्यरत केले आहेत. पाणीपुरवठ्यासाठी प्रतिवर्षी ६ ते ७ कोटी रुपये खर्च होत असून सुमारे १५० ते ३०० पाण्याचे टॅंकर्स मोफत पुरवले जात आहेत.
इतर शहरांच्या तुलनेत या ११ गावांतील पाणीपट्टी कमी असून लोहगावला एकूण पाणीपट्टीच्या २० टक्के, मुंढवा येथे साडेसतरा टक्के, फुरसुंगी येथे ६० टक्के अशा प्रकारची सवलत पाणीपट्टीत देण्यात आली आहे असे सांगून रस्त्यांसाठी आतापर्यंत ६२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले. कचरा संकलन करुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
Hadapsar News Bureau