Efforts are being made to start the work of diverting the flowing water of the western channel rivers to Marathwada this year
पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचे काम यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
निलंगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण
मराठवाड्याचा दुष्काळ दूर झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही
लातूर येथील कारखान्यात ‘वंदे भारत’ रेल्वेच्या बोगींची निर्मिती होणार
मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया
लातूर : कृष्णा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यात आणले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून २०२३ मध्येच या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निलंगा (जि. लातूर) येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सतत समाजाच्या भल्याचा विचार केला. मराठवाड्याच्या विकासासाठी ते आग्रही होते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी योजना आखल्या. चाळीस कलमी कार्यक्रम राबवून मराठवाडा, विदर्भ आणि कोकणच्या विकासाला गती दिली. यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेवून राज्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
लातूर येथे रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना मंजूर झाल्यानंतर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त केला होता. या बोगी निर्मिती कारखान्यात लवकरच ‘वंदे भारत’रेल्वेच्या बोगींची र्निमिती सुरु होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या मनोगतात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत काम करताना घडलेल्या प्रसंगांना उजाळा दिला. कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या विकासासाठी डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेवून समाजाच्या, देशाच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन केले.
डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी राज्यातील कष्टकरी जनतेच्या हिताची कामे केली. त्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या स्मारकामुळे समाजातील सर्व घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
समाज हिताचे कोणतेही काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांच्याकडे विचार स्पष्टता होती. त्यांच्या कार्यकाळात मांजरा, तेरणा खोऱ्यात अनेक विकासकामे झाली, असे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
विविध पदांची जबाबदारी पार पडताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्या पदांमुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर लोकांच्या हितासाठी केला. त्यांच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली, असे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. तसेच त्यांचे नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या कार्यकाळात हजारो लोकांची घरे उभी केली. त्यांच्या विषयीचा जिव्हाळा आजही अनुभवायला मिळतो. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविषयीच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
महाराष्ट्र शिक्षण समितीच्या वतीने विजय पाटील निलंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जीवनपट मांडण्यात आला. अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेश गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com