When to celebrate Raksha Bandhan? Which is the right time to tie Rakhi?
रक्षा बंधन कधी साजरे करावे ? राखी बांधण्यास योग्य मुहूर्त कोणता ?
पुणे : हिंदू धर्मात श्रावण महिना सुरु होताच सणांची ही सुरवात नागपंचमी पासून होते. याच काळात भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन होवून सोमवारचे उपवास केले जातात आणि याच महिन्यामध्ये भावा- बहिणीच्या गोड नात्याची गाठ अधिक घट्ट करणारा अन् संपुर्ण कुटुंबाच्या आनंदाला उधाण आणणारा रक्षाबंधन सण येतो.
मात्र या वर्षी पंचंगामध्ये या सणाची तिथी आणि तारीख बघताना थोडासा गोंधळ होतो. नेमका काय आहे हा गोंधळ आणि नेमके मग हे सण आपण कधी आणि कसे साजरे करावे हे आपण आता जाणून घेवूया.
श्रावण शुक्ल १५ म्हणजेच पौर्णिमा यादिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. यालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. आता यावर्षी ही तिथी कुठल्या तारखेला येते यासाठी पंचाग पाहिले असता रक्षाबंधन हे ११ ऑगस्टला दिसते ( श्रावण पौर्णिमा ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.३८ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.०५ वाजता समाप्त होईल ) मात्र यादिवशी तिथी ही श्रावण शुक्ल १४ दिसते. म्हणजे पौर्णिमा दिसत नाही. आता तिथी त्या सणाची नाही मग या तारखेला रक्षाबंधन कसे साजरे करावे असा प्रश्न अनायसे मनात येतो.
रक्षाबंधन नेहमी पौर्णिमेच्या दिवशी साजरे केले जाते. पौर्णिमा तिथी सूर्योदयाच्या वेळेपासून सुरू होते आणि ११ तारखेला तांत्रिकदृष्ट्या ही पौर्णिमा तिथी नाही.
अनेक पंडित ११ ऑगस्टला तर अनेकजण १२ ऑगस्टला रक्षाबंधन सांगत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही राखी अर्थात रक्षाबंधनाची नेमकी तारीख आणि मुहूर्त याबाबत संभ्रमात असाल.
यामध्ये नियम असा आहे की रक्षाबंधन हे भद्रा-मुक्त काळातच करावे. भद्रा काळात रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते. म्हणूनच भद्रा परिहाराचा त्याग करूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा, असे शास्त्रात सांगितले आहे. यासोबतच यंदा पौर्णिमाही दोन दिवसांची असल्याने रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करायचा, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
रक्षाबंधनासाठी प्रदोष काळचा मुहूर्त ११ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ०८:५४ ते ०९:४९ पर्यंत आहे. राखी बांधण्यासाठीही हा काळ योग्य असल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे, अनेक बहिणी ११ ऑगस्टच्या रात्री राखी बांधण्यास प्राधान्य देणार नाहीत.
तर अनेक १२ तारखेला उत्सव साजरा करतील.
१२ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ६ मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी असून, या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही पौर्णिमा तिथी असेल. या दिवशी भद्राची सावली राहणार नाही. त्यामुळे १२ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरेल.
तर तुमच्यासाठी योग्य माहिती अशी आहे की, यावेळी १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे योग्य ठरेल. या दिवशी राखी बांधल्याने कोणत्याही प्रकारचा दोष होणार नाही.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)