Pune Division will issue appointment letter to 316 candidates – Divisional Commissioner Saurabh Rao
पुणे विभागात ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार – विभागीय आयुक्त सौरभ राव
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी रोजगार मेळावा
पुणे : पुणे विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (३ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले असून यामध्ये शासनाच्या अधिपत्याखालील पुणे विभागातील कार्यालयात निवडीने पात्र ठरलेल्या सुमारे ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवनिमित्ताने एकाच वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राच्या महासंकल्प अंतर्गत गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे करण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयांच्या ठिकाणी विभागीय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मुंबई येथून मंत्रालयातून राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्तांची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी, विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या आयोजनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तसेच नियुक्ती आदेश देण्यात येणाऱ्या पात्र उमेदवारांशी प्रशासनाने संपर्क साधला आहे, असे सांगितले.
महावितरणमधील ३०७, महापारेषण कंपनीच्या एक, कोल्हापूर जिल्हा परिषद पाच आणि पुणे परिवहनच्या तीन अशा एकूण ३१६ उमेदवारांना यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत.
या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संदेशाचे प्रसारण करण्यात येणार आहे. समाजमाध्यमांद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे, असेही श्री. राव म्हणाले.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर येथील शासनाच्या अधीनस्त कार्यालयांमध्ये निवडप्रक्रिया पूर्ण होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सांगलीचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार गिरीष बापट, स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com