Will make permanent arrangements for villages that lose contact every year – CM
दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री
गडचिरोली जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
गडचिरोली : गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला.
यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच दौऱ्यात दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार तसेच गडचिरोली मेडिकल कॉलेज सुरू करणार असे जाहीर केले.
ते आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीला आले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण गडचिरोलीत भामरागड, अहेरी व सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीचा गडचिरोली दौरा केला.
खराब हवामानामुळे नागपूर येथून हवाई मार्गाने येणे व पाहणी करणे शक्य झाले नाही, मात्र रस्ते मार्गाने येऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पूरस्थिती, स्थलांतरितांबाबत माहिती सादर केली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.
तसेच तालुकास्तरावरून ऑनलाईन स्वरूपात उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवादात थेट तालुकास्तरावरील तहसीलदारांशी संवाद साधला तर प्रलंबित वन विभागाच्या प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com