‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार

Will provide huge funds for ‘Sarathi’ and ‘Annasaheb Patil Mahamandal’ schemes – Deputy Chief Minister Ajit Pawar

‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रालयातील बैठकीत ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ कामकाजाचा आढावा

मुंबई : ‘एमपीएससी’च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पहिल्या पाचपैकी 4, पहिल्या 10 पैकी 7, एकूण उत्तीर्ण 597 पैकी 198 उमेदवार ‘सारथी’ संस्थेचे आहेत. यावरुन ‘सारथी’ची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’च्या कामगिरीचे कौतुक केले.

देशात, जगाच्या पाठीवर उद्योगक्षेत्राची गरज ओळखून रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम तरुणांनी निवडावेत. प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. कृषी, उद्योग, आर्थिक क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्यविकासाचे अभ्यासक्रम निवडून पूर्ण करण्यासाठी ‘सारथी’ने तरुणांना मदत करावी.

राज्यातील तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसायात संधी देऊन यशस्वी होण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’नी त्यांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, त्यांना योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’चे कामकाज प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यात छत्रपती राजाराम महाराज गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या 11 हजार 186 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आातापर्यंत 7 हजार 674 विद्यार्थ्यांना 7 कोटी 36 लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांना मे महिनाअखेर वाटप करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीत ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. ‘सारथी’च्या माध्यमातून विद्यार्थी, विद्यार्थींनींसाठी वसतीगृहांची सोय करणे. कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरु करणे, ‘सारथी’ची विभागीय उपकेंद्रे सुरु करणे, तिथे पदभरती करणे आदी मुद्यांवर चर्चा झाली.

‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’ला आवश्यक निधी प्राधान्याने देण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला.’सारथी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवताना, जे अभ्यासक्रम आपल्या देशात उपलब्ध नाहीत, अशाच अभ्यासक्रमांचा विचार व्हावा. परदेशी शिक्षणासाठी निवडले जाणारे अभ्यासक्रम हे वैशिष्ट्यपूर्णच असतील, याची खात्री करण्याची सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

‘सारथी’ची पुणे मुख्यालय इमारत, कोल्हापूर उपकेंद्राची इमारत, तसेच खारघर-नवीमुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर येथील केंद्राच्या निर्मितीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *