Will, vision and positive attitude is needed to take the nation forward – General Dr V. K. Singh (Retd)
देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि सकारात्मक वृत्ती आवश्यक- जनरल डॉ.व्ही.के.सिंग (नि.)
पुण्यात एम.आय.टी. स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या दीक्षान्त समारंभात राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग यांचे प्रतिपादन
पुणे : विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि सकारात्मक वृत्तीसह उच्च ध्येय उरी बाळगण्याचा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तथा नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ.व्ही.के.सिंग (नि.) यांनी तरुण विद्यार्थ्यांना दिला.
पुण्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या दीक्षान्त समारंभात ते आज बोलत होते. उदयोन्मुख नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक पैलूंना राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग यांनी यावेळी स्पर्श केला.
राजकारण हे चांगल्या-वाईट गोष्टींचे मिश्रण असते परंतु, आपण कोणती भूमिका स्वीकारायची हे ज्याचे-त्यालाच ठरवावे लागते. राजकारणात पैशाचा वापर केला, तर तुम्ही दुष्टचक्रात अडकाल नि त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसेल, असे डॉ.सिंग यांनी सांगिले.
निवृत्त जनरल डॉ.व्ही.के.सिंग यांनी यावेळी सशस्त्र दलांचे उदाहरण दिले. सैन्यदले ‘सेवा हाच धर्म’ हे सूत्र मनात धरून एकतेने व एकात्मतेने काम करतात. सैन्यदलांमध्ये जातिधर्माच्या आधारे विभागणी/ वर्गीकरण केले जात नाही, म्हणूनच देशवासीयांना सैन्यदलांविषयी विश्वास वाटतो, असे त्यांनी नमूद केले.
आर्थिक आणि सामाजिक भेदभाव असतील तर लोकशाही टिकून राहू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. समाजात समानता प्रस्थापित होईल असा मार्ग निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी तरुणाईला केले. ‘विकासाच्या मुद्द्यांवर काम करून देशाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे’, असे त्यांनी अधोरेखित केले.
‘आपल्याला उज्ज्वल इतिहासाची परंपरा लाभली आहे, तथापि स्वातंत्र्य मिळाल्यावरही दुर्दैवाने राज्यकर्त्यांनी ब्रिटिशांचेच धोरण कायम ठेवले’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राजकारणाचे चित्र बदलले असून, वंचितांच्या प्रगतीकडे आणि विकासाकडे लक्ष केंद्रित केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
मिझोरमचे राज्यपाल डॉ.हरी बाबू कंभम्पाती, खासदार गजानन कीर्तिकर, माईर्स एमआयटीचे संस्थापक प्रा.डॉ.विश्वनाथ कराड, व्यवस्थापकीय संचालक तथा कार्यकारी अध्यक्ष डॉ.राहुल कराड यांच्यासह अनेक मान्यवर या दीक्षान्त सोहळ्याला उपस्थित होते. ‘राजकीय नेतृत्व आणि सरकार’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 14 आणि 15व्या बॅचच्या एकूण 56 विद्यार्थ्यांना यावेळी पदवीदान करण्यात आले.
हडपसर न्युज ब्युरो