“For a self-reliant India, women’s power must become self-sufficient”: Governor Bhagat Singh Koshyari
“आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे”
– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे.
उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती स्वत: आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महिला विद्यापीठ तसेच महिला महाविद्यालयांनी विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत कला क्षेत्रात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन ते परिपूर्ण नागरिक होतील असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांनी केवळ आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित न राहता देशविदेशातील संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून खऱ्या अर्थाने विश्वविद्यालय व्हावे असे राज्यपालांनी सांगितले.
पालघर व चंद्रपूर येथे महिला विद्यापीठाची उपकेंद्रे
महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नामुळे सुरु झालेले एसएनडीटी महिला विद्यापीठ केवळ पाच मुलींसह सुरु झाले व आज त्याचा ७ राज्यांमध्ये विस्तार झाला आहे. महिला विद्यापीठ लवकरच पालघर व चंद्रपूर याठिकाणी आपली उपकेंद्रे सुरु करणार असल्याची माहिती कुलगुरु उज्ज्वला चक्रदेव यांनी यावेळी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com