Work on a war footing to fill potholes on the roads – Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कामे करा
-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करावे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळात आवश्यकतेनुसार वाढ करावी , असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पुणे महानगरपालिका येथे शहरातील विकास कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, करसंकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख, पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराब दांडगे, प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, आगामी गणेशोत्सवात काळापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यसाठी मनपा प्रशासनाने तातडीने कामे पूर्ण करावीत. खड्डे बुजविण्यसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, कटक मंडळे यांनी समन्वयाने कामे करावे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा. शहरातील प्रमुख ५ निवडक रस्त्यांसाठी अल्प मुदतीची निविदा काढून कामे त्वरित करावी.
थकीत कर वसुलीबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन १२ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात येईल. सर्वांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या योजनांचे वॉर्डर्निहाय कामे तातडीने पूर्ण करावे. जायका प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रकल्पाची कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरु होतील यासाठी योजना तयार करावी असेही ते म्हणाले.
पुणे शहरात सुरू असलेली विविध विकासकामे मे लवकरात लवकर मार्गी लावून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करा, असेही श्री. पाटील म्हणाले.
मनपा आयुक्त श्री. कुमार यांनी पुणे मनपा कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत बैठकीत माहिती दिली.बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही करुन प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील, असेही ते म्हणाले.
यावेळी लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध विकासकामाबाबत चर्चा केली. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, युवा संकल्प अभियान समितीचे अध्यक्ष राजेश पांडे,माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर आदी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com