Work started by MMRDA should be completed on time – Environment Minister Aditya Thackeray reviewed various works
एमएमआरडीएमार्फत सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण व्हावीत – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला विविध कामांचा आढावा
मुंबई : मुंबई शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
यामध्ये वरळी-शिवडी, नरीमन पॉईंट-कफ परेड या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ही कामे करताना नागरी सुविधा कमीत कमी बाधित होतील याची दक्षता घ्यावी, जेथे खोदकाम करावयाचे आहे तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी.
प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अत्यावश्यक असतील तेथेच आणि कमीत कमी झाडे तोडावीत, बाधित होणाऱ्या व्यक्तींना प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती द्यावी, असे निर्देश श्री.ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दक्षिण मुंबईकडे येताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरीमन पॉईंट ते कफ परेड यांना जोडणारा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाच्या प्रगतीचाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला.
व्यावसायिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतील या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होऊन वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून प्रस्तावित असणारा हा रस्ता नरीमन पॉईंट पासून कफ परेड कडे जाणाऱ्या प्रकाश पेठे मार्गापर्यंत उड्डाणपूल स्वरूपात असल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे.
या प्रकल्पामुळे मच्छिमारांच्या दैनंदिन जीवनात बाधा येऊ नये यादृष्टीने त्यांच्यासमवेत पुन्हा एकदा चर्चा करण्यात यावी, तसेच या मार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी सर्व संबंधित विभागांच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.
Hadapsar News Bureau.