Working as a general worker for the overall development of the state – Chief Minister Eknath Shinde
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले स्व. आनंद दिघे यांना अभिवादन
ठाणे : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या
शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे ठाणे येथील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गुरूपौर्णिमेनिमित्त आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांना वंदन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्व. दिघे यांना वंदन करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com