Workshop on safety of school students
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी कार्यशाळेचे आयोजन
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा विधी प्राधिकरण पुणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच सलाम मुंबई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय आ.देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक, जिल्हा स्कुल बस समितीचे सचिव तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सलाम बॉम्बे फाउंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक संजय ठाणगे, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औंदुंबर उकिरडे, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यावर होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध, पोक्सो कायदा, तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न शाळा,विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना व परिवहन समिती कामकाज, ‘हर घर तिरंगा’ उपक्रम अंतर्गत ध्वज संहिता जाणीव जागृती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश देशमुख म्हणाले, मुलींवरील अत्याचार दूर करण्यासाठी मुलींच्या सबलीकरणासोबत मुलांमध्येही जाणीव जागृती झाली पाहिजे. लैंगिक छळ झाल्यास त्याबाबत पोलिसामध्ये न घाबरत तक्रार करण्यासाठी आवश्यक विश्वासदर्शक वातावरण शाळेमध्ये निर्माण झाले पाहिजे. तसेच शाळेने मूल्यशिक्षणावर भर देवून याबाबत मार्गदर्शन करावे. मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे,ज्यूडो यांचे प्रशिक्षण द्यावे. स्वत:ला नियंत्रित करणे गरजेचे आहे याबाबत उद्बोधन झाले पाहिजे.अत्याचार झाल्यास न्याय व्यवस्था तसेच पोलिस प्रशासन मदत करत असतेच,परंतू समाजाने अशावेळी मदतीसाठी पुढे यावे.
आयुष प्रसाद म्हणाले, १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाळेशी निगडीत असलेल्या प्रत्येक घटकांनी ध्वज संहितेचा अवलंब करून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. प्रत्येक शाळेने विविध स्पर्धोंचे आयाजेन करावे. शैक्षणिक गुणवत्ता तसेच भौतिक सुविधा सुधारण्यासाठी शाळा सुधार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शाळेच्या आस्थापना बाबत तक्रारी निवारण करण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्म तयार करत आहोत.त्यामुळे आस्थापनेकडे येणाऱ्या तक्रारी कमी होतील, असे त्यांनी सांगितले.
श्री. कर्णिक म्हणाले,१८ वर्षांखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायद्याबाबत जागृती होणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांमुलींची सुरक्षितता महत्वाची आहे. शाळेमध्ये मुलामुलींच्या सुरक्षितेबाबत काही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनला पोलिस काका व पोलिस दिदी यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
सलाम फाउंडेशनचे सहायक महाव्यवस्थापक नारायण लाड आणि श्री. ठाणगे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. १८ वर्षाच्या खालील मुलांना व्यसनापासून दूर ठेवल्यास ते भविष्यात व्यसनमुक्त राहू शकतात. त्यासाठी शाळेने विशेष प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
श्री. भोर यांनी शालेय परिवहन समितीची भूमिका व विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक याविषयी तर पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी
किशोरवयीन मुलांमुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षणाधिकारी श्रीमती वाखारे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक विभागीय शिक्षण उपसंचालक उकिरडे यांनी केले. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी उपक्रमाची माहिती दिली. ३५० शाळा कार्यशाळेत सहभागी झाल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com