May 5th World Cartoonist Day celebrations in SPPU Museum of Cartoon Art
विद्यापीठात भरली छोट्या व्यंगचित्रकारांची शाळा!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यंगचित्रकला संग्रहालयात स्पर्धा, कार्यशाळा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून ५ मे जागतिक व्यंगचित्रकार दिन साजरा
पुणे :‘जागतिक व्यंगचित्रकार दिना’निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्र कला संग्रहालयाने कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत व्यंगचित्रकार दिन साजरा केला. यावेळी विद्यापीठाच्या इमारतीत जणू छोट्या बच्चे कंपनीची शाळाच भरली होती.!
विद्यापीठाच्या ‘मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज’ विभागांतर्गत विभाग प्रमुख प्रा. माधवी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये स्थित व्यंगचित्रकला संग्रहालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यंगचित्रकार दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, ८ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात व्यंगचित्रकार सूरज ‘एस्के’ श्रीराम यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत एकूण २५ मुलांनी सहभाग घेतला. मुलांना व्यंगचित्रकलेच्या मूलभूत गोष्टी शिकण्याचा आनंद झाला. सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी व्यंगचित्रकला संग्रहालयाची एक छोटीशी टूर आयोजित करण्यात आली होती.
या विशेष दिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे, नाशिक आणि अहमदनगर येथील सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘नागरी समस्या, पर्यावरणीय प्रदूषण, हवामान बदल आणि राजकीय समस्यांसह विविध विषयांवर सुमारे ११० प्रवेशांसह स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला’, असे संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी सांगितले. स्पर्धेचे परीक्षण व्यंगचित्रकारांच्या पॅनेलने केले आणि विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात आली. साक्षी शिंदे हिला प्रथम, मोना ठाकरे हिला द्वितीय तर नेहा राठौर हिला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देखील देण्यात आली आणि सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
सूरज ‘एस्के’ श्रीराम यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, ‘त्यांनी ही कला पुढे जोपासली पाहिजे आणि कार्टूनिंग कलेसाठी इतर परफॉर्मिंग आर्ट्सप्रमाणेच खूप सराव आणि मेहनतीची गरज आहे’.
उत्सवाचा एक भाग म्हणून, व्यंगचित्रकार चैतन्य गोवंडे यांनी व्यंगचित्रांचे (कॅरीकेचर) प्रात्यक्षिक दाखवले आणि संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना काही जणांची कॅरीकेचर काढून त्यांना भेट देण्यात आली. या उपक्रमाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला.
या उपक्रमांव्यतिरिक्त स्थानिक हौशी व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शनही लोकांच्या पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते. भारताच्या विविध भागातील व्यंगचित्रकारांनीही त्यांची व्यंगचित्रे संग्रहालयाला भेट स्वरूपात दिली आणि उपक्रमाचे कौतुक केले.
व्यंगचित्रकला संग्रहालयामध्ये भारतातील नामांकित व्यंगचित्रकारांच्या कार्यांचे प्रदर्शन आहे आणि भारतीय इतिहासाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील दुर्मिळ व्यंगचित्रांचा मोठा संग्रह आहे. संग्रहालयात विविध पुस्तके आणि संशोधन लेखांचा संग्रह देखील आहे. हे संग्रहालय नियोजित दिवशी हेरिटेज वॉक दरम्यान लोकांसाठी खुले असते. याशिवाय संग्रहालय मंगळवार ते शुक्रवार दुपारी २ ते ४ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. व्यंगचित्र आणि व्यंगचित्र कलेबद्दल लोकांची आवड निर्माण करण्यासाठी अशा अनेक कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्याची संग्रहालयाची योजना आहे.
हडपसर न्यूज ब्युरो