World War III will be the end of the earth
तिसरं महायुद्ध हे पृथ्वीचा अंत करणारे असेल
-संदीप वासलेकर
आर्टिफिशयल इंटेलिजन्स, सायबर, ऑटोमेशन, बायो टेक्नॉलॉजी आदींचा गैरवापर करत मोठा राक्षस तयार केला जातो आहे
विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभागात व्याख्यान
पुणे : तिसरे महायुद्ध हे अर्थातच आण्विक युद्ध असेल आणि हे युद्ध जर झाले तर पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी संपेल व पुढील दहा हजार वर्ष इथे कोणताही जीव निर्माण होऊ शकणार नाही, म्हणूनच युद्धाशिवाय असणारे जग प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवणे हाच पर्याय सर्व देशांनी वापरण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप वासलेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. यावेळी संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे संचालक व विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे, सचिन इटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संदीप वासलेकर म्हणाले, पूर्वी धर्माच्या आधारे जे तंटे होत ते आता राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर होत आहेत. मात्र अति राष्ट्रीयत्व ही संकल्पना उदयाला येत असून यातून आंतरराष्ट्रीय वाद होताना दिसत आहे. या सर्वात आता आर्टिफिशयल इंटेलिजन्स, सायबर, ऑटोमेशन, बायो टेक्नॉलॉजी आदींचा गैरवापर करत मोठा राक्षस तयार केला जातो आहे. माणूस आणि प्राण्यांचे जनुके एकत्र करत नवीन प्रयोग होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जंतू तयार केले जात आहेत, या सर्वच गोष्टी जीवसृष्टी साठी घातक आहेत.
मी माझ्या ‘ अ वर्ल्ड विदाउट वॉर ‘ या माझ्या पुस्तकात यावर सखोल भाष्य केले आहे. भविष्यात या विषयावर चांगले संशोधन, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच वैश्विक सुरक्षा या विषयाचे धडे देण्यासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.खरे यांनी यावेळी विभागात सुरू असणाऱ्या अभ्यासक्रामांविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींची माहिती व्हावी या दृष्टीने या व्याख्यानाचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com