Youth should come forward to strengthen democracy – Chief Election Commissioner Rajeev Kumar
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे
– मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मल्टी मीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन
युवा मतदार नोंदणी मोहीम लोकचळवळ व्हावी- अनुपचंद्र पांडे
पुणे : जगात लोकशाहीचा विकास होत आहे; देशांची प्रगती होत आहे. अनेक समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व घटक सहभागी होतात. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मल्टी मीडिया प्रदर्शन’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात मतदारजागृतीच्या अनुषंगाने सादर केलेल्या लावणी, जोगवा, जागरण-गोंधळ, कोळीगीत, वासुदेव नृत्य आदी लोककला तसेच गीतांना दाद देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्य, लोककला या आपल्या सर्वांना, समाजाला जोडून ठेवण्याचे काम करतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक नामांकित विद्यापीठ आहे. त्यामुळे हा कार्यक्रम येथे घेतल्याचे सांगून श्री. राजीव कुमार पुढे म्हणाले, आपला प्रचंड देशात आपण सहभागीतेच्या तत्वावर विश्वास ठेवतो, चर्चा, सहभागाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवण्यावर आपला विश्वास असतो. अनेक गुंतागुंतीच्या, सामाजिक, समस्या, आर्थिक, भौगोलिक समस्या, मानवनिर्मित समस्या अशा सर्व समस्या हळुवारपणे, शांततेत सोडवल्या जातात. त्याच पद्धतीने मतपत्रिकेच्या प्रचंड अशा ताकदीच्या माध्यमातून सत्तेचे हस्तांतरणही अतिशय सुलभतेने होत असते.
१८-१९ वयोगटाची लोकसंख्या आणि प्रत्यक्ष झालेली मतदार नोंदणी यामध्ये तफावत आहे. या कार्यक्रमामुळे युवकांच्या लोकशाहीतील सहभागावर चांगला परिणाम होईल असा विश्वास व्यक्त करतानाच तरुणांनी नोंदणी करावी, मित्रांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे तसेच मूल्यांवर आणि मुद्द्यांवर आधारित मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.
युवा मतदार नोंदणी मोहीम लोकचळवळ व्हावी- अनुपचंद्र पांडे
निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे म्हणाले, कला, साहित्य, गीत, संगीत यामुळे पुणे हे राष्ट्राचे बौद्धिक केंद्राप्रमाणे सांस्कृतिक केंद्रही आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठातून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचा देशपातळीवरील शुभांरभ केला जात आहे. कोणीही मतदार नोंदणीपासून राहू नये, मत आपल्या इच्छेने द्यावे मात्र मतदान जरुर करावे आणि निर्भयतेने आणि कोणत्याही प्रलोभनाशिवाय मतदान द्यावे या तीन मुद्द्यावर आयोगाचा भर आहे.
कुलगुरू डॉ. काळे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी विद्यापीठाला मिळाली याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी श्रीमती रंजना देव शर्मा यांनी प्रास्ताविकात निवडणूक आयोगाच्या उपक्रमांची प्रसिद्धी, प्रचार करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा प्रशासनाकडून मतदार नोंदणीसाठी व्यवस्था केलेल्या दालनाला भेट देऊन मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. यावेळी नुकतीच मतदार नोंदणी केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रार्थना मोढा हिच्याशी संवाद साधला तसेच सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतली. लोकशाही भिंतीवर (डेमोक्रसी वॉल) स्वाक्षरी केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com