Free GRE, TOEFL, IELTS guidance for students studying abroad
परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीआरई, टोफेल, आयईएलटीएसचे मोफत मार्गदर्शन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचा सामंजस्य करार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला असून या करारानुसार आता भारतातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याअंतर्गत जीआरई, टोफेल, आयईएलटीएस यांसारखे भाषा अभ्यासक्रम मोफत शिकविण्यात येणार आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असते. परंतु त्यांना व्हिसा, परदेशी शिक्षण व त्याबाबची अधिक माहिती नसते, त्यामुळे त्यांना इच्छा असूनही मार्ग शोधता येत नाही अशा विद्यार्थ्यांना या कराराच्या माध्यमातून मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
‘सिलेक्ट युवर युनिव्हर्सिटी ऑनलाइन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन’ या दिल्ली येथील संस्थेसोबत हा करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, गिरीश भवाळकर, फाउंडेशनचे संचालक संदीप सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशी जाण्यासाठी आवश्यक इंग्रजी भाषेचे ज्ञान म्हणजेच IELTS/TOEFL चे मोफत शिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, समुपदेशन अशी सर्वांगीण मदत करण्यात येईल. जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांचा परदेशी जाण्याचा मार्ग सुकर होईल.
– डॉ. विजय खरे, संचालक
आंतरराष्ट्रीय केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. खरे यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छित असतात पण बऱ्याचदा त्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. या कराराच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करून आम्ही निवडक विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देत आहोत. या बाबतची अधिक माहिती विद्यार्थ्यांना http://www.unipune.ac.in/dept/International%20Centre/ वर उपलब्ध होईल.
Hadapsar News Bureau.