Heavy rains are expected along the Konkan coast for the next five days
पुढचे पाच दिवस कोकण किनारपट्टीवर तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : राज्याच्या अनेक भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असून काही ठिकाणी पूर किंवा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज अतिवृष्टी झाली. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढचे पाच दिवस कोकण किनारपट्टीवर तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार यांनी सांगितलं. कोकणातल्या अनेक नद्या दुपारपर्यंत धोका आणि इशारा पातळीच्या वर वाहत होत्या. नंतर पावसाचा जोर कमी झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीच्या वर वाहत असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग आणि रायगडमधल्या सर्व नद्या संध्याकाळी इशारा पातळीपेक्षा कमी पातळीवर वाहत होत्या.
मुंबईत आज पहाटेपासून अति मुसळधार पाऊस सुरू आहे. माथेरानपेक्षा मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी अधिक पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत सलग दुसऱ्या दिवशी १४० ते १५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागानं येत्या दोन दिवसांत मुंबई आणि ठाण्यात २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यानं सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईतली उपनगरीय रेल्वे सेवा उशिरानं धावत आहे. चेंबूर, हिंदमाता, गांधी मार्केट, अँटॉप हिल, सायन, किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचल्यामुळं बेस्टनं पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरू केली आहे.
पुणे जिल्ह्यातल्या घाट माथ्यावर येत्या चार दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात असून जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. वरंध घाट त्याचबरोबर माळशेज आणि ताम्हिणी घाट परिसरातही पावसामुळं दरडी कोसळून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये. त्याचबरोबर वाहतुकीवरही त्याचा परिणाम होऊ नये यादृष्टीनं विशेष काळजी घेतली जात आहे. शालेय विद्यार्थी त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी या कालावधीत शक्यतो घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे ही अवश्य वाचा
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. एनडीआरएफच्या २ तुकड्या आज रात्री जिल्ह्यात दाखल होणार आहेत. संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून संध्याकाळी ती २६ फुटांवर होती. राधानगरी धरणात सुमारे ७९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरणातून अकराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातलं २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. पुरबाधित नागरिक आणि जनावरांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे तसंच त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
घाटमाथ्यावर पावसाचे पाणी अडून भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने घाटमाथ्यावरील पाण्याचे स्रोत मोकळे करावेत. तसंच, सर्वांनी दक्ष राहून आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सक्त सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सायंकाळी चार नंतर पावसाला सुरुवात झाली गेल्या अनेक दिवसापासून पाऊस हुलकावणी देत होता , त्यामुळे जिल्हयातल्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आज शहरातल्या अनेक भागांसह ग्रामीण भागात ही पावसाने हजेरी लावली.त्यामुळे बळीराजा काही अंशी सुखावला आहे.
धुळे जिल्ह्यातही अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं शेतकर्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला असून, आत्तापर्यंत ५५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र हवामान विभागानं जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केल्यानं. येत्या आठ दिवसांत ८० टक्के क्षेत्रावर पेरणी होईल, अशी शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे.