Greetings from Governor Ramesh Bais on Vijayadashami
राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विजयादशमीनिमित्त शुभेच्छा
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी विजयादशमी (दसरा) निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमीचा सण अशाश्वतावर शाश्वताच्या व दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. दसरा व विजयादशमीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुख-शांती, समाधान व समृद्धी घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात.
‘नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते.‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतो, कारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, दुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा असा हा दिवस आहे.साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करुया, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे जे उदात्त, चांगले त्याचा दुष्ट आणि अंधकारावर विजय याचीच जाणीव हा सण करून देत असतो. विजयादशमीनिमित्त होणारे रावणाचे दहन हे अहंकाराचे, अन्यायाचे आणि अविचाराचे होवो. राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रक्रमाने जात राहावे आणि सर्वांचे जीवन मंगलमय व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. गौतम बुद्धांची शिकवणूक अंगिकारणे आणि अहिंसेच्या मार्गावरून जाणे हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करुया, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा
यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटं तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस. असत्यावर सत्यानं, अज्ञानावर ज्ञानानं विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. आपापसातील मतभेद, मनभेद, वादविवाद, भांडणतंटे विसरुन राज्यासमोरचं प्रत्येक आव्हान एकजुटीनं, एकदिलानं परतवून लावण्याचा निर्धार करुया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा
राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि नाशिकच्या शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेण्यांच्या पायथ्याशी विजयादशमीदिवशी बोधीवृक्ष रोपण कार्यक्रम आणि ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाबोधीवृक्ष महोत्सवास, तसंच यानिमित्तानं नाशिकला येणाऱ्या देशभरातील बुद्ध उपासक, अनुयायांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विजयादशमीनिमित्त शुभेच्छा”