The government is committed to bringing health facilities to the people at the grassroots level
तळागाळातील माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद जिल्ह्यातील ‘महाआरोग्य शिबिरा’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
औरंगाबाद : गरिबांच्या कल्याणासाठी राज्यातील हे शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
अयोध्यानगरी मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारंभास ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार सर्वश्री हरिभाऊ राठोड, संजय शिरसाठ, प्रशांत बंब, नारायण कुचे आदी उपस्थित होते.
प्रारंभी शिबिरासाठी उपस्थित सर्व तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, शिबिरासाठी सहकार्य करणारे शासकीय अधिकारी, संस्था यांचा श्री.फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्री.फडणवीस म्हणाले की, महाआरोग्य आरोग्य शिबीर सामान्य माणसाला असाध्य आजारावरील तपासणी व उपचार मोफत करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात साडेतीन लाख नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली हा एक उच्चांक आहे. या शिबिरासाठी विविध दानशूर व्यक्ती,संस्था, वैद्यकीय तज्ज्ञ यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्धर आजारावरील औषधाच्या किंमती कमी करून सर्वसामान्य लोकांना उपचार स्वस्त केले आहेत. सर्व देशवासियांना कोविडची लस मोफत देण्यात आली. देशात अडीच लाख ‘वेलनेस सेंटर’च्या माध्यमातून गरीब लोकांवर उपचार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान आरोग्य कल्याण निधीतून वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळते. वयोश्री योजनेतून वयोवृद्धांना उपचार व सहाय्य साहित्य मोफत दिले जाणार आहे.
राज्य शासनानेही महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना उपचार मिळणार आहेत. आता ही योजना राज्यातील 12 कोटी जनतेला लागू असणार आहे. आरोग्य सेवेचा अधिक विस्तार करण्यासाठी शासनाने राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील 11 वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत. उर्वरीत तीन लवकरच सुरु होतील, असे श्री.फडणवीस सांगितले.
महाआरोग्य शिबिरात आज तपासणी व उपचार होणाऱ्या रुग्णांना ते पूर्ण बरे होईपर्यंत उपचार, औषधी व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया इ. सगळे उपचार मोफत दिले जातील, असे सांगून त्यांनी सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थनाही केली.
देशाच्या आरोग्य सुविधांच्या बजेटमध्ये सहापटीने वाढ- डॉ. भागवत कराड
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यासाठी बजेटमध्ये सहा पटीने वाढ करण्यात आली आहे. आयुष्मान भारत सारख्या योजनेतून देशातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. त्यात ग्रामीण अथवा शहरी असा भेदभाव नाही, साऱ्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गरीब कुटुंबातील विद्यार्थी डॉक्टर व्हावेत- गिरीष महाजन
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, गरीब कुटूंबातील हुशार विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी शासनाने उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यात 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु केली आहेत. या महाविद्यालयातून हुशार, गरीब विद्यार्थी डॉक्टर व्हावेत. त्यांनी डॉक्टर होऊन समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा करावी.
ते पुढे म्हणाले की, गरीब,गरजू नागरिकांना महाआरोग्य शिबिरातुन लाभ होणार आहे. मोफत मार्गदर्शन आणि वैद्यकीय उपचारातून आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे. अधिकारी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी होत आहे.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व अधिकाधिक रुग्णांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ होईल. या संधीबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
प्रास्ताविक राजेंद्र साबळे यांनी केले. रामेश्वर नाईक यांनीही या आयोजनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिरिष बोराळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “तळागाळातील माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध”