Review of health services in Sassoon Sarvopachar Hospital by Divisional Commissioner Saurabh Rao
ससून सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवांचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा
पुणे : विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषध पुरवठा आदींच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध औषधोपचार कक्षांना भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. नरेश झंजाड, डॉ. संजय गायकवाड, डॉ. गिरीश बारटक्के, उपअधीष्ठाता डॉ. शेखर प्रधान, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव, उप वैद्यकीय अधीक्षक सुजीत धीवारे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. राव यांनी रुग्णालयात दाखल होणारी रुग्णसंख्या, रुग्णालयातील वैद्यकीय, नर्सिंग तसेच अन्य मनुष्यबळाचा आढावा घेतला. रुग्णालयातील औषध साठा तसेच औषध खरेदीच्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाहीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यांनी स्थानिक स्तरावर औषध खरेदी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगून रुग्णालयाला अत्यावश्यक व जीवनरक्षक औषधांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येईल, असेही ते म्हणाले.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून नर्सींग कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णालयातील रिक्त नर्सेस आदी पदे उपलब्ध होतील, असेही डॉ. राव आणि जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले. रुग्णालयाच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल मुख्य सचिवांना सादर करण्यात येणार असल्याचेही श्री. राव म्हणाले.
वर्ग चार ची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदूनामावली तपासणी आदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रुग्णालयाला आवश्यक ते सहाय्य्ा गतीने पुरविण्यात येईल. बाह्यस्रोतातून मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतची प्रक्रियाही जलद पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले. रुग्णालय स्वच्छतेसाठी नेमलेल्या यंत्रणेकडून आधुनिक पद्धतीने स्वच्छतेचे काम होईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.
रुग्णालयात १ हजार २९६ खाटा असून त्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल असल्याचे यावेळी अधीष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले. टर्शरी आणि अतिविशेषोपचार रुग्णालय असल्याने इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी औषध कक्षाला भेट देऊन औषध साठा आदी पाहणी केली. तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयु), ट्रॉमा केअर आयसीयु तसेच रुग्ण कैदी यांच्या कक्ष क्र. १६ ला भेट देऊन पाहणी केली. रुग्ण कैद्यांच्या उपचाराबाबत डॉक्टरांचे पथक नेमून प्रकरणनिहाय विश्लेषण करुन निर्णय घ्यावा, अशाही यावेळी सूचना देण्यात आल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ससून सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवांचा आढावा”