Heritage walk at the university again from today ..!
आजपासून विद्यापीठात पुन्हा हेरिटेज वॉक..!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऐतिहासिक भुयार पाहण्याची संधी.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हेरिटेज वॉक हा उपक्रम गेल्या काही काळात कोव्हिड निर्बंधांमुळे थांबला होता, मात्र ऐतिहासिक मुख्य इमारतीला नुकतीच १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनापासून (१० मार्च) हा हेरिटेज वॉक उपक्रम कोव्हिडचे निर्बंध पाळून पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारत, इमारतीत असणारे भुयार, विद्यापीठातील संग्रहालये, येथील जैवविविधता, निसर्गरम्य परिसर हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून २०१८ साली विद्यापीठाने हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू केला आहे. या हेरिटेज वॉकला आजपर्यंत हजारो नागरिकांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देत विद्यापीठाच्या निर्मितीचा इतिहास जाणून घेतला आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनादिवशी त्यांच्या कार्याला अभिवादन करून विद्यापीठातील इतिहास विभाग, मानवशास्त्र विभाग आणि माध्यम समन्वय कक्ष या तीनही विभागांच्या वतीने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली काही काळ थांबलेल्या या हेरिटेज वॉक चा प्रवास पुन्हा सुरू होत आहे.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे माजी सदस्य सचिव राजेंद्र होलानी यांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉक ची सुरुवात सकाळी ११.३० वाजता डी. व्ही. पोतदार संकुल येथून होणार आहे. हा हेरिटेज वॉक सर्व नागरिकांसाठी खुला आहे.